Ad will apear here
Next
‘मी संपादक-प्रकाशकांचा लेखक’
टी-टाइम या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) देवयानी अभ्यंकर, श्रीपाद ब्रह्मे, दिलीप प्रभावळकर, मुकुंद टाकसाळे आणि सुप्रिया लिमये

पुणे : ‘मी दिग्दर्शकाचा नट आहे, तसाच संपादक-प्रकाशकांचा लेखक आहे. माझ्यातला लेखक आणि अभिनेता स्वतःला व्यक्त करण्याच्या ऊर्मीतून बाहेर पडला. कधी तो लेखक म्हणून बाहेर पडतो, तर कधी अभिनेता म्हणून; पण तरीही अभिनय क्षेत्रातल्या कामाच्या व्यग्रतेमुळे लेखक थोडा मागे राहिला,’ असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते आणि संवेदनशील लेखक दिलीप प्रभावळकर यांनी पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील पत्रकार आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘टी-टाइम’ या पुस्तकाचे आणि ‘ई-बुक’चे प्रकाशन शनिवारी (२५ नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार भवनात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

ब्रह्मे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या ‘टी-टाइम’ या सदरातील निवडक लेखांचे हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’ने त्याचे ई-बुक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर, ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमये या वेळी उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘टी-टाइम’ पुस्तकाचे आणि ‘ई-बुक’चे प्रकाशन झाले. त्यानंतर झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये प्रभावळकर, तसेच टाकसाळे यांनी ब्रह्मे यांच्या लेखनाचे कौतुक केले. तसेच, या दोघांनीही सदरलेखनाबद्दलचे आपले अनुभव आणि काही गमतीशीर किस्से सांगून सभागृहात हशा पिकवला. 

‘मी तात्या विंचू, चौकट राजा किंवा गांधी दिसेन, हे सगळे दिग्दर्शकाला वाटते आणि नंतर मी ते साकारतो. त्याचप्रमाणे विविध दैनिके आणि नियतकालिकांच्या संपादक-प्रकाशकांना मी त्यांना हवे तसे लिहू शकेन, असा विश्वास वाटत होता आणि माझ्याकडून तसे लिहिले गेले. संगीताचा कान लागतो, त्याप्रमाणेच समाजातील विसंगती टिपण्याची दृष्टी सदरलेखनासाठी लागते. निखिल वागळेंनी ‘षट्कार’साठी लिहायला सांगितल्यावर मी लिहू शकेन, असे वाटले नव्हते; पण त्यांच्या आग्रहानंतर ‘गुगली’ हे सदर साकारले. त्यातून गावस्कर, वाडेकरांसारख्या दिग्गजांच्याही टोप्या उडवायचो. त्यासाठी द्वारकानाथ संझगिरी मला आतल्या बातम्या पुरवायचे. माझे लेखन हे सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण असायचे,’ अशा आठवणी दिलीप प्रभावळकर यांनी सांगितल्या. ‘लोकसत्ताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अरुण टिकेकरांसारखे मोठे संपादक घरी येऊन सदरलेखनासाठी आग्रह करून गेले. त्यामुळे वेळ नसतानाही त्यांचा आग्रह मोडवेना म्हणून सदर लिहिले. ते ‘अनुदिनी’ हे सदर खूप लोकप्रिय झाले. ते लिहिताना मी पाच भूमिका जगलो. आजूबाजूच्या घटनांचे संदर्भ त्यासाठी उपयोगी पडले. अनेकदा मुंबई-पुणे चेअर कारच्या प्रवासात मला लिहायचे असायचे; पण कोणी तरी भेटले की ते तसेच राहायचे. अशा प्रकारे डेडलाइन सांभाळत सदर लिहिले. पुढे त्यावरून मालिका होईल, ती लोकप्रिय होईल आणि त्यात मीच टिपरेंची भूमिका करीन, असे मला वाटलेही नव्हते,’ अशा आठवणी प्रभावळकरांनी जागवल्या. ‘चिमणराव हे कॅरेक्टर कितीही विनोदी असले, तरी त्यासाठी मला प्रसूतिवेदना सोसाव्या लागल्या आहेत,’ असे चिं. वि. जोशी यांनी म्हटल्याची आठवणही प्रभावळकरांनी जागवली. तसेच मालिकांमुळे पुस्तकांचा खप वाढल्याची उदाहरणे गुंड्याभाऊ-चिमणराव आणि श्रीयुत गंगाधार टिपरे या मालिकांवरून अनुभवायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

सदरलेखकाला आत्मविश्वास असणे आणि त्याच्याकडे विनोदबुद्धी असणे कसे महत्त्वाचे असते, यावर टाकसाळे यांनी आपल्या खास विनोदी शैलीत भाष्य केले. एक सदर सुरू असताना त्यातील एका लेख काही कारणामुळे प्रसिद्ध करणे शक्य नसल्यामुळे ऐन वेळी कसा लिहून द्यावा लागला आणि तो लेख लोकांना आवडला, त्याचा किस्साही टाकसाळे यांनी सांगितला. त्यांनी लिहिलेल्या सदरातील काही विनोद आणि त्यावरून घडलेले किस्से त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहातील वातावरण एकदम हास्यमय होऊन गेले. संपादक म्हणून अरुण टिकेकर लेखकाचा किती विचार करायचे, याची आठवणही त्यांनी सांगितली.

‘पुस्तकाचे प्रकाशन हा सर्वांना भेटण्याचा सोहळा असतो. त्यातूनच लेखनाला प्रेरणा मिळते. आपल्या लेखनामुळे कोणाला तरी आनंद मिळतो आहे, ही भावना लिहायला शक्ती देणारी असते. त्यातूनच पुढेही लिहीत राहीन,’ अशी भावना ब्रह्मे यांनी व्यक्त केली. ‘सदरांचे किंवा आपल्या लेखनाचे डॉक्युमेंटेशन पुस्तकामुळे होते. त्यातून पुढील काळात त्या मागच्या काळाचं चित्र उभे करण्यास मदत होते. त्यामुळे ‘अर्काइव्ह’ला महत्त्व आहे. सगळेच लेखन पर्फेक्ट असेल, असे नाही; परंतु माझ्यासारखा विचार करणारे कोणी तरी असतील त्यांना ते आवडेल,’ अशा शब्दांत ब्रह्मे यांनी पुस्तक प्रकाशित करण्यामागची भावना व्यक्त केली. या सदराची, तसेच आधीच्या सदराची आणि त्यापासून तयार झालेल्या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणीही ब्रह्मे यांनी सांगितली.

अभिवाचन करताना सिद्धार्थ केळकर

या वेळी सुप्रिया लिमये यांनी ‘बुकगंगा’च्या उपक्रमांची माहिती दिली आणि ‘ई-बुक’चे महत्त्व सांगितले. देवयानी अभ्यंकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, आभार मानले आणि मनोगत व्यक्त केले. पुस्तकनिर्मितीशी संबंधित असलेल्या सर्वांचेही या वेळी सत्कार करण्यात आले. ब्रह्मे यांचे सहकारी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सिद्धार्थ केळकर, तसेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी या वेळी पुस्तकातील प्रत्येकी एका लेखाचे अभिवाचन केले. त्या अभिवाचनाला, तसेच अवंती मेहता यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलेल्या चहा-कॉफीबद्दलच्या कवितेला उपस्थितांची दाद मिळाली. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन केले आणि मान्यवरांशी गप्पा खुलवत नेल्या. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. 

(‘टी-टाइम’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या पुस्तकातला ‘थंडी’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. श्रीपाद ब्रह्मे यांची सर्व पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPJBI
Similar Posts
थंडी पुण्यातील पत्रकार आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं ‘टी-टाइम’ हे पुस्तक आज (२५ नोव्हेंबर) कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. ‘बुकगंगा’तर्फे त्याचं ई-बुकही येत आहे. ब्रह्मे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सलग चार वर्षं ‘टी-टाइम’ हे साप्ताहिक सदर लिहिलं. हलक्या-फुलक्या शैलीतलं, अनेकांच्या मनातल्या
‘सायलीची वाटचाल थक्क करणारी’ पुणे : ‘डाउन सिंड्रोमवर मात करून, नृत्यासारखी कठीण कला आत्मसात करून आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करणारी, सायली नुसतीच ‘अमेझिंग चाइल्ड’ नाही, तर ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग चाइल्ड’ आहे. तिच्या प्रतिभेने मी थक्क झालो आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सायली अगावणे हिचे कौतुक केले.
‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’ पुणे : ‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज कलाकारांबाबत अभ्यासू पत्रकारांनी, अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण लेखन करावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केली. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रिन्स चार्मिंग’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले
‘आतून वाटलं पाहिजे, मला आंत्रप्रिन्युअर व्हायचंय’ पुणे : ‘पेंटिंग आणि थिएटर’ या दोन गोष्टी करत जेव्हा सुरुवात केली, तेव्हा याने आपलं आयुष्य धोक्यात टाकलंय असा घरच्यांचा समज होता. असं असतानाही मला आतून जे वाटत होतं, ते मी सतत करत राहिलो. हे आतून जे वाटणं आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. असंच आतून वाटलं पाहिजे, की मला आंत्रप्रिन्युअर व्हायचंय,’ असे मत सुप्रसिद्ध

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language